पुणे – दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेच्या भवानी पेठ येथील सोनावणे हॉस्पिटलमधील गर्भवती महिलेला करोना संसर्ग झाल्यानंतर येथील 17 आरोग्य सेवकांचे विलगीकरण करण्यात आले. त्यानंतर हे प्रसृतीगृह महापालिकेकडून बंद करण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांत हे हॉस्पिटल पुन्हा सुरू केले जाणार असून येथे फक्त करोनाबाधित गर्भवती तसेच लहान मुलांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
सोनावणे हॉस्पिटल येथे 80 बेडची सुविधा असून लहान मुलांचा 10 खाटांचा अतिदक्षता विभागही आहे. शहरात ज्या भागात करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे, त्या भागात काही प्रमाणात गर्भवती तसेच 10 वर्षांच्या आतील लहान मुलांनाही या आजाराची बाधा आहे. त्यातच, काही प्रकरणांत आई बाधित आहे, तर मुले बाधित नाहीत. तर काही प्रकरणांत मुले बाधित आहेत, मात्र आई-वडील बाधित नाहीत. अशा स्थितीत बाधित आईजवळ लहान मुले गेल्यास ती बाधित होण्याची, तर बाधित मुलाजवळ आई-वडील गेल्यास ते बाधित होण्याची भीती आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
…म्हणून हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय
सोनावणे हॉस्पिटल येथे गर्भवती महिना करोनाबाधित सापडल्यानंतर येथील सर्व सुविधा बंद करून फक्त ओपीडी तपासणी सुविधा ठेवली होती. त्यामुळे अन्य गर्भवती आणि लहान मुलांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवले होते. मात्र, तेथेही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना सुविधा देण्यात अडचणी येत असल्याने सोनावणे हॉस्पिटल पुन्हा सुरू केले जाणार आहे.