मुंबई : राज्यासह मुंबईतील करोना संसर्गही हळूहळू वाढत असून शनिवारी करोना व्हायरसमुळे आणखी एका पोलिसाचा बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिस दलातील ५२ वर्षीय हेड कान्स्टेबलचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत या करोना योद्ध्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलिस हवालदार संदीप सुर्वे ( ५२ वर्ष ) यांचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्व मुंबई पोलीस परिवार सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली !!!— Mumbai Police (@MumbaiPolice) April 26, 2020
मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलिस हवालदाराचे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्व मुंबई पोलीस परिवार सहभागी असल्याचे ट्विट मुंबई पोलिसांनी केले. करोनामुळे मुंबई पोलिस दलातील हा दुसरा मृत्यू आहे. राज्य पोलीस मुख्यालयाच्या आकडेवारीनुसार शनिवारी करोना बाधित पोलिसांची संख्या शंभरी पार गेल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, करोना साथरोगाने राज्य पोलीस दलातील पहिला बळी शुक्रवारी रात्री घेतला होता. मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले ५७ वर्षीय हवालदार नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू पावले. आतापर्यंत डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि पोलिसांनीही करोनाने ग्रासले आहे.