पुणे – गाडी आडवी घातल्याने, नीट चालव म्हटल्याचा राग मनात धरून लोखंडी गजने मारहाण करोन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात पिता-पुत्राला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एम. आगरकर यांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.
भगवान महादु लाड (वय 52) आणि त्याचा मुलगा अमोल (वय 23, दोघेही, रा. निमोणे, ता. शिरूर) अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. दोघांनी ऍड. भालचंद्र पवार, ऍड. किरण रासकर आणि ऍड. योगेश पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. जामीन झालेल्या दोघांसह अन्य तिघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. शरद आनंदराव ढोरवजकर (वय 35, रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 8 सप्टेंबर 2019 रोजी ही घटना घडली.
फिर्यादी हे एस.टी.स्टॅण्डवर चायनीज आणण्यासाठी चालले होते. त्यावेळी भगवान याचा मुलगा मनोज याने गाडी आडवी घातली. त्यावेळी फिर्यादीनी गाडी नीट चालव, असे त्याला म्हटले. याचा राग मनात धरून कुटुंबातील पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करून फिर्यादींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादींच्या पत्नीलाही हात, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात शिरूर पोलिसांनी भगवान आणि मुलगा या दोघांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांनी ऍड. भालचंद्र पवार, ऍड. किरण रासकर आणि ऍड. योगेश पवार याच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्यासह विविध अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.