मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिराने आव्हाडांना अचानक ताप आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समजत आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढत असताना आमदार जितेंद्र आव्हाड हे स्वत: नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत होते. त्याच दरम्यान तेथील एका पोलीस कर्मचाऱ्याला करोना झाल्याची माहिती समोर आली. या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड येत असल्याने त्यांची सुद्धा करोना टेस्ट करण्यात आली होती. आव्हाड यांच्या या टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना आता अचानक ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जितेंद्र आव्हाड यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, नोकर, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.