कंपन्याच्या ताळेबंदातील नफा कमी; रुपयाचे घसरणे चालूच
मुंबई : जागतिक शेअर बाजारात क्रूडचे दर शून्य डॉलरच्या खाली कोसळल्यानंतर त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला. भारतीय शेअर बाजार निर्देशांकही मंगळवारी मोठ्या प्रमाणात कोसळले. क्रुड कोसळल्यानंतर त्याचा सर्वात पहिला परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारावर झाला. जपान, हॉंगकॉंग आणि युरोपातील शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले. मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स साडेतीन टक्क्यांनी म्हणजे 1011 अंकांनी कोसळून 30,636 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 280 अंकांनी कोसळून 8,981 अंकावर बंद झाला.
विश्लेषकांनी सांगितले की, इंधनाचे दर कोसळल्यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेत इंधनाचा वापर कमी प्रमाणात केला जाणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. लॉक डाउनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. ती पूर्ववत होण्यास अनेक महिन्याचा कालावधी लागू शकतो. पुरवठा साखळी पूर्ववत झाल्याशिवाय अर्थव्यवस्थेचे इंजिन चालू होणार नाही.
याचा अंदाज गुंतवणूकदारांना आला आला आहे. क्रुड कोसळल्यामुळे रिलायन्स कंपनीचा शेअर साडेचार टक्क्यांनी कोसळला. त्याचबरोबर इतर इंधन कंपन्यांचे शेअरही कोसळले. भवितव्य अंधकारमय दिसत असल्यामुळे मंगळवारी बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक साडेचार टक्क्यांपर्यंत कोसळला. धातु बाजाराचेही काही खरे नाही असे वाटल्यामुळे हिंदाल्को कंपनीचा शेअर तर साडेनऊ टक्क्यांपर्यंत कोसळला. इतर धातू कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. कंपन्याचे ताळेबंद नकारात्मक येत असल्यामुळेही गुंतवणूकदारांचा धिर कमी होत आहे.
आतापर्यंत रुपया घसरत असल्यामुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरचे भाव काही प्रमाणात स्थिर होते. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्वासाठी व्हिसा देणे बंद केले आहे. त्याचा नकारात्मक परिणाम माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरवरही झाला. त्यामुळे ईन्फोसिस, टीसीएस इत्यादी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर कमी झाले. माहिती तंत्रज्ञान कंपन्याचे भारतातील कर्मचारी एच 1- बी व्हिसा वापरतात. ट्रम्प यांच्या निर्णयाचा माहीती तंत्रज्ञान कंपन्यावर परिणाम होणार नाही.
मात्र तरीही माहीती तंत्रज्ञान तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर पिछाडीवर होते. भारतातील औषध कंपन्यांनी सध्याच्या काळात उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय औषध कंपन्यांच्या औषधांना केवळ भारतातच नाही तर जगातून मागणी वाढली आहे. या पडझडीच्या या वातावरणातही औषधी कंपन्यांचे शेअर मात्र आघाडीवर होते. सध्याच्या परिस्थितीत ग्राहक वस्तू, औषधे आणि मोबाईल कंपन्यांचे शेअर स्थिर आहेत.
क्रुड कोसळल्यामुळे आणि शेअर बाजार निर्देशांक कोसळल्यामुळे रुपयाचे मूल्यही आज तीस पैशांनी कमी होऊन बाजार बंद होताना रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 76 रुपये 83 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला होता. जागतिक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचे प्रकार चालूच आहेत.