रुग्ण संख्या 48 वर : चार वर्षांच्या चिमुकलीलाही करोनाची लागण
उपचाराधीन बाधितांपैकी एक”पॉझिटिव्ह’, एक निगेटिव्ह
पिंपरी – एका रुग्णाची “करोना’ने चौदा दिवसानंतरही पाठ सोडलेली नाही. 14 दिवसांनंतरचे त्याचे अहवाल “पॉझिटिव्ह’ आले आहेत. तसेच त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका रुग्णाचा तपासणी अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला घरी सोडण्यात येईल. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाला आणखी 14 दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. नव्याने आढळलेल्या “करोना’ रुग्णांमध्ये एक चार वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
मार्च महिन्याच्या मध्यास शहरामध्ये “करोना’चे रुग्ण आढळू लागले. शहरात सुरुवातीला एकूण 12 रुग्ण आढळले होते. परंतु सर्व 12 रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले. सुमारे दहा दिवस शहरात एकही “करोना’चा नवा रुग्ण सापडत नव्हता. त्यावेळी वाटत होते, की शहर लवकरच पूर्णपणे करोनामुक्त होईल, परंतु दिल्ली येथील तबलिगी जमातच्या मरकजमधून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या रुग्णांवर उपचारांनंतर 14 दिवसांनी ते बरे होतील व रुग्णालयातील “करोना’ रुग्णांचा आकडा कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु 2 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्याने सर्वांनाच झटका बसला आहे.
चौदा दिवस उपचार केल्यानंतर त्यांची दोनदा चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचे अहवाल निगेटिव्ह येत होते. मात्र दिल्ली येथून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या रुग्णाचे चौदा दिवसांच्या उपचारानंतरही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
एकूण 35 रुग्णांवर सुरू आहेत उपचार
नव्याने आढळलेल्या चार रुग्णांमुळे शहरातील बुधवारी सायंकाळपर्यंत रुग्णसंख्या 48 वर पोहचली आहे. त्यापैकी 12 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 35 इतकी झाली आहे.
चार नवीन रुग्णांची भर
शहरात सातत्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या 48 वर पोहचली असून बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत चार नवीन रुग्णांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामध्ये एक पुरुष, दोन महिला व एका चार वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. जागतिक आकडेवारीनुसार असे मानले जात होते की लहान मुलांना “करोना’ची लागण होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. परंतु एका लहान मुलीलाही “करोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.