नवी दिल्ली : जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणि मृतांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात 21 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा तब्बल 1.45 लाखांच्या वर पोहोचला आहे. तर संपूर्ण जगात 5 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याची माहिती समोर येत आहे.
जगभरात कोरोनामुळे रोज नवीन बदल पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरांनी याबाबत माहिती दिली. याआधी त्यांनी न्यूयॉर्क शहरामध्ये सर्वांना मास्त घालणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. दरम्यान, न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील कोरोनाचे केंद्र बनले आहे.
याव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये लॉकडाऊन 3 आठवड्यांनी वाढवला आहे. ब्रिटनचे विदेश सचिव डॉमनिक राब यांनी याबाबत डाउनिंग स्ट्रीट येथून घोषणा केली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाले असून ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आराम करत आहेत. त्यामुळे डॉमनिक राब यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच यासंदर्भात बोलताना त्यांनी, कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी तेथील आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले. दोघांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमावलीवरून मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान राष्ट्रपती जायर बोल्सोनारो आणि आरोग्यमंत्री लुईज हेनरिक मॅन्डेटा यांच्यातील मतभेद सार्वजनिक रित्याही पाहायला मिळाले होते. ब्राझीलचे आरोग्यमंत्री सतत सोशल डिस्टंन्सिंग आणि आयसोलेशन महत्त्वाचे असल्याचे सांगत होते. तर राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी ब्राझीलची अर्थव्यवस्था जास्त महत्त्वाची असल्याचे सांगितले.