हनुमा विहारीने व्यक्त केल्या भावना
नवी दिल्ली – भारताच्या कसोटी क्रिकेट संघात स्थान मिळाले असले तरीही देशातील करोडो चाहत्यांप्रमाणे मी देखील लहानपणापासून सचिन तेंडुलकरचा फॅन होतो. सचिन बाद झाला की चक्क ढसाढसा रडायचो, अशा शब्दात मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सचिन या नावाची जादू केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील चाहत्यांवर दोन दशकांपेक्षाही जास्त काळ होती. आज सचिन निवृत्त होऊन 7 वर्षे झाली. मात्र, तरीही ही जादू तसुभरही कमी झालेली नाही. लहान असताना अनेकांप्रमाणे मी देखील सचिनचा फॅन होतो. भारताचा प्रत्येक सामना मी पाहायचो. सचिन बाद झाला की त्यावेळी लहान मुलासारखा ढसाढसा रडायचो. त्यानंतर मला उर्वरित सामना पाहावासाच वाटत नसे त्यामुळे सचिन बाद झाल्यावर टीव्ही बंद केला जायचा, अशी आठवणही विहारीने सांगितली.
सचिनने ज्या काळी पदार्पण केले त्यावेळी त्याच्यासारखी फलंदाजी करता येईल का हा विचार सातत्याने मनात येत असे. सचिन रमेश तेंडुलकर या नावाचे गारुड जगावर मोहिनी घालत असताना त्याचा खेळ पाहतच मी मोठा झालो. त्याची खेळपट्टीवर आल्यावर सामन्यात येणारी रंगत अनेकांप्रमाणे मी देखील अनुभवली आहे. त्याचाच आदर्श घेत या खेळाकडे वळलो. निवृत्तीनंतरही जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आजही सचिनचेच नाव घेतले जाते यातच त्याचे महानपण सिद्ध होते, असेही विहारीने स्पष्ट केले.