मुंबई – करोनाशी सामना करताना आपण काय करु शकतो यासंबंधी राज्य सरकारला अनेक तज्ञ तसंच राजकीय नेते सल्ला देत असून प्रस्ताव मांडत आहेत. तसेच करोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्यांसाठी आता बॉलिवूडमधील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील सरकारसमोर असाच एक प्रस्ताव मांडला आहे. ग्रामीण भागातही चांगली आरोग्य सेवा दिला जावी या हेतूने त्यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “करोनाच्या पार्श्वभूमीवर सक्षम असलेल्या सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का, याबाबत विचार करण्यात यावा. यामुळे ग्रामीण भागातही चांगली आरोग्य सेवा देण्यास मदत होईल”. रोहित पवार यांनी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का अशी विचारणा केली आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले,“विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी सध्या बँकांमध्ये मोठी गर्दी होतेय, त्यामुळे सर्वच बँकांनी आपापल्या अगदी गावपातळीपर्यंतच्या शाखांमध्येही सॅनिटायझर ठेवावं व तसा आदेश बँकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी द्यावा. कोरोना प्रतिबंध व लोकांची सुरक्षा यासाठी हे आवश्यक आहे,” असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.