एकूण रुग्णांची संख्या 4 वर पोहचली; बारामतीकरांचे धाबे दणाणले
बारामती (प्रतिनिधी) : समर्थ नगर येथील कोरोना संक्रमित रुग्णाच्या 12 नातेवाईकांना तपासणीसाठी पुणे येथील औंध रुग्णालयात भरती करण्यात आले होते . त्यापैकी 7 जणांचे रिपोर्ट हाती आले असून त्यातील 2 व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. संक्रमित रुग्णाचा मुलगा व सून कोरूना संक्रमित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे.
श्रमिकनगर येथील रिक्षा चालकास कोरोनाची बाधा झाल्यानंतर समर्थ नगर येथे कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला शहराच्या दृष्टीने ही धक्कादायक बाब आहे. श्रमिक नगर येथील पहिल्या रुग्णास कोरोनाची बाधा कोठून झाली हे अद्याप निष्पन्न झाले नाही . तोपर्यंत समर्थ नगर येथे दुसरा रुग्ण सापडला त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेली चार महिन्यात या रुग्णाने कोठेही प्रवास केलेला नाही. घराबाहेर न पडलेल्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली कशी याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. कुटुंबातील कोणाकडून ही बाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाला समोरील चिंता वाढली असून कोरोनाचे सावट गडद झाले आहे.
कोरोनाचे वाढते संकट पाहता बारामतीकरांनी खबरदारी घ्यावी घरातून बाहेर पडू नये . घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात असून शहरातील पोलिस बंदोबस्त वाढवला असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले. शहरात कोरोनचा दुसरा रुग्ण सापडल्यानंतर योग्य ती दक्षता घेतली जात असून प्रशासनाने आता भाजीपाला, फळे, चिकन, मटण, मासळी यांची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असल्याचे बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी सांगितले.