अजून पण आपण बाहेर फिरणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
ओरडून दमले पोलीस, ओरडून दमलं सरकार,
अक्कल नाहीच का तुम्हाला? कसे हो एवढे भिकार?
तुमच्यासोबत लेकरांच पण वाटोळं करणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
कोरोनानं थैमान घातलंय, आकडा रोज वाढतोय,
कोविड नावाचा राक्षस, अर्थव्यवस्थेला पण फाडतोय,
बाहेर बोंबलत फिरून, देशाला घेऊन बुडणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
लहानपणी तुमचे आईबाप पीठ मागून खायचे ना?
नाही मिळालं खायला तर चिमटे पोटाला घ्यायचे ना?
नाही मिळालं थोडे दिवस, खाट लगेच धरणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
21 दिवस लोकडाऊननं नुकसान सगळ्यांचंच झालंय,
शेती, नोकरी, व्यवसायाला अधूपण आलंय,
पैसा सगळा तिरडीवर घेऊन जाणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
थोडे दिवस भाजी नसली तर लगेच कोण जाणार नाय,
असेल नसेल मीठ मसाला, लगेच हृदय थांबणार नाय,
मरतय जग सारं, तुम्ही साजूक, पौष्टिक खाणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
बँकेसमोर पैशासाठी भल्यामोठ्या रांगा लावून,
किती आणले पैसे? 500, ते ही जीव टांगणीला लावून,
सरकार देतंय, आनंद आहे, तुम्ही लाईनीत मरणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
बाहेर बोंबलत हिंडणाऱ्यांची आरती केली पाहिजे,
सरसकट सगळ्यांची येरावड्यात भरती केली पाहिजे,
पोलिसांना सिंघम बनायला लावणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
हात जोडून संगतायेत सगळे, सगळे आता थकले,
ज्यांनी नाही ऐकलं त्यांचं, ते जीवाला मुकले,
न ऐकून वाटोळं आमचं नेहमींसारखं करणारच आहात का?
हॉस्पिटलचे बेड्स पेशंटनी भरणारच आहात का?
~ निखिल विजय गुरव, वीर.
सामाजिक जाणिव करणारे अप्रतिम लेखन व सुंदर मांडणी…खूप मस्त कविता लिहिलंय सर. आपल्या कवितेच्या माध्यमातून जागृती निर्माण होईल अशी अपेक्षा…..