- करोनाविरुद्ध लढाई : गुरुवार, शुक्रवार दोन दिवशी पाळणार बंद
तळेगाव स्टेशन – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये “करोना’च्या पार्श्वभूमीवर विषाणूचा संसर्ग वाढू नये. तळेगावकरांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने, साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार गुरुवारी (दि. 9) आणि शुक्रवारी (दि. 10) या दोन दिवशी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील, अशी माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली. नगरपरिषदेच्या घोषणेनंतर पुढील दोन दिवस तळेगाव हद्दीत पूर्णपणे “लॉकडाऊन’ पाळण्यात येणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून स्थापन केलेल्या स्थानिक समन्वय समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभागृहनेते अमोल शेटे, तळेगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष संतोष दाभाडे, जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे, नगरसेवक निखिल भगत, उद्योजक संतोष शेळके आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये गुरुवारी (दि. 9) आणि शुक्रवारी (दि. 10) असे दोन दिवस तळेगाव हद्दीत पूर्णपणे लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. या कालावधीमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत दूधवाले, तसेच दवाखाने व औषध दुकाने हेच सुरू राहतील, तर किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री आदी अत्यावश्यक सेवा दोन दिवस पूर्ण बंद राहतील. अत्यंत महत्वाचे काम असेल, तरच नागरिक कामानिमित बाहेर येतील. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
करोना विषाणूचा संसर्ग तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत वाढू नये. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, सर्वांनी सहकार्य करावे. कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक समन्वय समितीकडून करण्यात येत आहे.