कल्याण : दिल्लीत माता कोरोनाबाधीत असतानाही नवजात अर्भकाला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे दिलासादायक वृत्त हाती येत असतानाच कल्याण येथे अवघ्या सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची बाधा झाल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. त्याच्या कुटुंबियांपासून या बाळाला बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या बाळाच्या 60 वर्षीय आजीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज 24 वर पोहचली आहे.
आज आढळलेल्या कोरोना रूग्णांमध्ये 41 वर्षाचा रुग्ण आहे. हा रुग्ण डोंबिवली पश्चिम, गरीबाचा वाडा या भागातील असून इतर दोन रुग्ण हे कल्याण पश्चिमेच्या चिकणघर परिसरात नुकत्याच सापडलेल्या कोरोना बाधिताच्या सहवासात आलेले आहेत. 60 वर्षीय महिलेसह 6 महिन्यांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
डोंबिवली शहरातील एक 60 वर्षाची महिला बरी झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरूीही लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.