मुंबई-पुण्यानंतर आता मालेगाव शहर करोनाचा नवा हॉटस्पॉट
नाशिक/यवतमाळ : मुंबई-पुण्यानंतर आता मालेगाव शहर देखील करोनाचा नवा हॉटस्पॉट बनले आहे. मालेगावमध्ये दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज आणखी 8 जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यासह मालेगावात एकूण रुग्णांची संख्या 126 वर जाऊन पोहोचली आहे. दुसरीकडे यवतमाळमध्येही वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या 142 झाली आहे. या परिस्थितीमुळे शहरातील एकूण 14 परिसर कॅंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हा सर्व भाग सील करण्यात आला आहे. त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शहारत 4 एसआरपीएफच्या तुकड्या, 150 अधिकाऱ्यांसह सुमारे 1 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
यवतमाळमध्ये आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या सर्व व्यक्ती एकाच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्या आहेत. यात तीन कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेले हे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती आहेत. त्यांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला आज (25 एप्रिल) प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता यवतमाळमध्ये 40 जणांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 10 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे.