कामगार विभाग आणि क्रेडाई संस्थेच्या मदतीने बांधकाम मजुरांच्याही जेवणाची सोय
पुणे – जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग या सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयाने नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येत आहे.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बांधकाम साईट्सवर अडकलेल्यास मजुरांना एक वेळचे भोजन देण्यात येत आहे. कामगार विभागाच्या मदतीने ही सोय करण्यात आली आहे. क्रेडाई या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार तसेच बांधकाम मंडळाकडे नोंद असलेल्या मजुरांना “अटल आहार’ योजनेंतर्गत माध्यासन्हय भोजन देण्याची योजना आहे.
उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर व तहसीलदार सुनील कोळी यांच्या उपस्थितीत पाषाण भागातील सुतारवाडी येथील 250 कुटुंबांना 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 1 किलो खाद्यतेल, 1 किलो दाळ, 1 किलो मीठ, हळद, जिरे मसाल्याचे 1 पाकीट वाटण्यात आले. वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. वाटप केलेले साहित्य साधारणपणे 10 दिवस इतके पुरेल. आवश्यकतेनुसार पुन्हा वाटप करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.
फोनवर दूर होणार अडचण
लॉकडाऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात काही अडचण येऊ नयेत, यासाठी तसेच इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरू असून 020-261-233-71 /1077 टोल फ्री नंबर आहे. हा नियंत्रण 24 कक्ष तास कार्यरत आहे. त्यावर करोनाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
कामगारांसाठी हेल्पलाइन
कामगार, विस्थापित अथवा बेरोजगार व परराज्यांतील अडकलेले कामगार यांच्या तक्रारीबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. सदर कक्षाचे फोन नंबर 020-2611-1061 व मोबाइल नंबर 751-776-8603 असा असून या नंबरवर कामगारांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत. या तक्रारीबाबत उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी हेल्पलाइन
ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष 020-297-066-11 स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकतात. त्यासाठी सहायक आयुक्त विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना तसेच कामगार, मजूर व इतर कुठल्याही तक्रारीसाठी या नियंत्रण कक्षाकडे तक्रार देता येईल. या तक्रारीचे तात्काळ निरसन व अंमलबजावणी नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येईल. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून वॉर्ड ऑफिसरच्या मदतीनेही भोजन तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. प्रशासन जनतेच्या समस्यांबाबत संवेदनशील असून कोणतीही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क साधावा
– नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी