अहमदाबाद -गुजरातच्या अहमदाबाद शहरातील 36 करोनाबाधितांची नावे आणि त्यांच्या राहण्याचे पत्ते स्थानिक पालिकेकडून जाहीर करण्यात आले. संशयित रूग्णांचा शोध वेगाने घेण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले.
साधारणपणे करोनाग्रस्तांची नावे आणि त्यांच्या राहण्याची ठिकाणे याविषयीची माहिती उघड केली जात नाही. मात्र, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ती माहिती जाहीर करण्याचे सूतोवाच नुकतेच केले. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:हून तपासणीसाठी पुढे यावे या उद्देशातून तसे केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यापाठोपाठ अहमदाबाद पालिकेने नावे जाहीर केली आहेत. गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या शंभरीजवळ पोहचली आहे. त्यातील 36 रुग्ण एकट्या अहमदाबाद शहरातील आहेत. करोनाबाधितांची अधिक संख्या असलेल्या देशातील 10 ठिकाणांना हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये अहमदाबाद शहराचाही समावेश आहे.