सुरुवातीला स्वत:चेच कुटुंब बाधित; 50 रुग्णांमध्ये 30 जणांना संपर्कातून लागण
पुणे – दुबईहून मुंबई आणि पुण्यात दाखल झालेल्या करोना विषाणूने महिन्याभरात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हात पसरले. आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात एकूण 50 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील केवळ 20 रुग्णांचा परदेशातील प्रवासाचा इतिहास आहे. मात्र, अन्य 30 जणांना परदेशातून आलेल्या व्यक्तींपासून लागण झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे लागण झालेल्या व्यक्ती या कुटुंबातील सदस्यच आहे. त्यामुळे करोना विषाणू हा प्रथमत: स्वत:च्याच कुटुंबावर घाला घालत असून अजूनही वेळ गेली नाही. नागरिकांनी खबरदारी घेऊन स्वत:ला विलगीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दुबई, अमेरिका, नेदरलॅन्ड, स्कॉटलॅन्ड, आयर्लंड, लंडन, कतार, फिलिपाईन्स, थायलंड, जपान आणि अबुधाबी या देशांतून पुणे शहरासह जिल्ह्यात आलेल्या 20 परदेशी नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये पुणे शहरात एकूण 33 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 11 रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत तर, 22 रुग्णांना संसर्गातून बाधा झाली आहे. दुबईहून मुंबईमार्गे पुण्यात आलेल्या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे प्रथमत: समोर येताच, प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांच्या कुटुंबाची तपासणी केली असता, त्यांच्या मुलीला आणि मुंबईहून पुण्यात येण्यासाठी ज्या कॅबचा त्यांनी वापर केला त्या कॅबचालकालाही करोनाची लागण झाली. दुबईहून एकूण 5 प्रवासी पुणे शहरात आले. तर अमेरिका, नेदरलॅन्ड, स्कॉटलॅन्ड, आयर्लंड, लंडन या देशांतून प्रत्येकी एक व्यक्ती शहरात आली.
घरातील व्यक्तींना बाधा…
पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 12 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 3 प्रवासी दुबईहून, फिलिपाईन्सवरून 2 तर अमेरिका, थायलंड आणि जपान येथून प्रत्येकी 1 असे एकूण 8 प्रवासी परदेशातून आले आहेत. तर, चार व्यक्तींना संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. पुणे ग्रामीण भागात अबुधाबीवरून आलेल्या एक प्रवासी करोनाबाधित आढळून आला. तर त्याच्यापासून 4 जणांना संसर्ग झाल्याचे दिसून आले.