डॉ. मेघश्री दळवी
करोनाचा वाढता प्रसार, त्याच्या चाचण्या, आणि संसर्ग रोखण्याचे प्रयत्न- सतत बातम्या येत आहेत. त्यातला चाचण्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. यासारख्या साथीच्या रोगात वेळेवर निदान होणे, आणि रूग्णाला विलग करून रोगप्रसाराला आळा घालणे हेच अस्त्र प्रभावी ठरते. चाचण्या तातडीने आणि मोठ्या प्रमाणात करायला हव्यात याबाबत कोणताच संदेह नाही. पण त्यासाठी लागणारं साहित्य आणि मनुष्यबळ कमी पडू शकतं. अशा वेळी एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची प्रचंड मदत होऊ शकते. हीच कल्पना आता पुढे येते आहे.
करोना चाचणीत पहिल्या टप्प्यावर शरीराचं तापमान पाहिलं जातं. एअरपोर्टवर, मॉलमध्ये, हॉस्पिटल्समध्ये आणि इतर गर्दीच्या ठिकाणी इन्फ्रारेड थर्मोमीटर वापरताना तुम्ही पाहिलं असेल. शरीराला स्पर्श न करता दुरून पटकन तापमान पाहण्याच्या या तंत्राचा आज पुष्कळ फायदा होत आहे. पण तरीही एका वेळी फक्त एका व्यक्तीची चाचणी होऊ शकते. हेच तंत्रज्ञान आणखी पुढे नेलं तर थर्मल कॅमेरा वापरून समूहातील कोणाकोणाच्या शरीराचं तापमान जास्त आहे हे एकाच स्कॅनमध्ये पाहता येईल. या व्यक्तींना बाजूला काढून नंतर त्यांची पुढील तपासणी करता येईल. शरीरातील तापमानाचा आलेख या कॅमेऱ्याच्या मदतीने मिळू शकतो, तोही अर्ध्या अंशापर्यंत अचूक.
एआय प्रणालीच्या सहाय्याने एका वेळी अनेक कॅमेऱ्याच्या नोंदी एकत्रितपणे पाहून तासाला हजार व्यक्तींच्याबाबत निष्कर्ष काढता येईल. त्यापुढच्या टप्प्यात छातीच्या स्कॅनवरून न्यूमोनियासदृश स्थिती आहे का हे पाहण्यासाठी एआय प्रणाली वापरता येईल. वैद्यकीय तज्ज्ञ उपचारात व्यग्र असताना, रोगनिदानाचा हा भार उचलायला तंत्रज्ञान सज्ज होतं आहे.
या झपाट्याने प्राथमिक तपासणी पूर्ण झाल्यावर त्याच्या तपशीलवार नोंदीही तत्काळ उपलब्ध होतील, त्या ऑनलाइन पटकन शेअर करता येतील, आणि पुढील उपाययोजना वेगाने करता येईल. जगभरात जलदगतीने फैलावणाऱ्या करोनासारख्या साथीला प्रतिबंध करायला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
वेळच्या वेळी अचूक रोगनिदान करण्यासाठी एआय वापरण्यावर गेली काही वर्षे संशोधन सुरू आहे, काही प्रयोग यशस्वी होत आहेत, आणि आजच्या कसोटीच्या वेळी या प्रयत्नांचं महत्त्व अधोरेखित होत आहे. गूगलच्या डीप माइंड या एआय प्रणालीच्या मदतीने मूत्रपिंडाला इजा होण्याआधी सुमारे दोन दिवस अचूक भाकीत करता येतं. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजणे, डायलिसिसची व्यवस्था करून ठेवणे ही तयारी शक्य होते.
कर्करोग किंवा डोळ्यांचे मोठे आजार यांचं निदान योग्य वेळेत करण्यासाठी डीप माइंडसोबतचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅनवरून रुग्णाच्या तब्येतीविषयक निष्कर्ष काढायला एआय प्रणालीला केवळ 1.2 सेकंद लागतात. तर सायकॉलॉजिकल आजारांसाठी रुग्णाची दीर्घकाळ नोंद घेऊन त्यावरून निदान करण्यात एआय प्रणाली अत्यंत उपयुक्त
ठरत आहे.