चौथ्या रुग्णांचा अहवालही निगेटिव्ह : पिंपरीतील तीन रुग्णांची चौदा दिवसांची अग्निपरीक्षा संपली
रुग्णांच्या चेहऱ्यावर झळकले हसू
– प्रकाश गायकर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाचे पहिले पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन पुरुष रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या दोनही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी घरी सोडण्यात आले. तिसऱ्याही एका रुग्णाचा उपचारानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचे दुसऱ्यांदा घशातील द्राव एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ते प्राप्त झाल्यानंतर त्या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये 12 मार्च रोजी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. पुणे येथे सापडलेल्या दोन रुग्णांसोबत दुबई येथे त्यांनी प्रवास केला होता. त्यांना संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. चौदा दिवस त्यांच्यावर उपचार केल्यानंतर गुरुवारी त्यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्याने ते करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, शुक्रवारी सकाळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक विलास मडेगिरी, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. तीनही रुग्णांना महापालिकेच्या रुग्णवाहिकेमधून त्यांच्या घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांना निरोप दिला.
वायसीएम रुग्णालयातील करोनाबाधित रुग्ण हे बरे झाल्याने डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱी यांच्यामध्येही समाधानाचे वातावरण बघायला मिळाले. आपल्या रुग्णालयातील पहिले पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन जात असतानाचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या या तीनही व्यक्तींना पुढचे दोन आठवडे होम क्वांरटाईन करण्यात येणार आहे.
मी कोविड पॉझिटिव्ह होतो. वायसीएममध्ये आमच्यावर खूप छान उपचार केले. डॉक्टर व नर्स यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमची काळजी घेतली. पंधरा दिवसांमध्ये खूप चांगली सकारात्मक उर्जा मिळाली आहे. रुग्णालयात असताना नवीन पुस्तके वाचली, योगासने केली. तसेच चांगला आहारही मिळाला. त्यामुळे लवकर बरे झालो. नागरिकांनी आपआपल्या घरी थांबून स्वतःची काळजी घ्या. बाहेर लॉकडाऊन आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करा.
– बरा झालेला रुग्ण
आता गुढीपाढवा झाला
आज तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने गुढीपाढव्याचा सण वाटत आहे. बाकीचे रुग्णही लवकरात लवकर बरे होतील. महापालिकेच्या वतीने करोनाला हरवण्यासाठी कसोसीने प्रयत्न सुरु आहे. सहा दिवसांमध्ये आपल्याकडे एकही पाझिटिव्ह रुग्ण नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. नागरिकांनी घरी थांबून सहकार्य करावे आपण लवकरच या करोना विषाणूचा अंत करु.
– माई ढोरे, महापौर.