पुणे – इतिहसाचा संपन्न असा वारसा लाभलेल्या पुणे शहरात अनेक वारसा स्थळे आहेत. आज शहरातील जवळपास प्रत्येक भागात एक वारसा स्थळ नक्की असेल. मात्र, अनेकदा माहितीअभावी ही वारसास्थळे दुर्लक्षित राहतात. तुमच्या जवळील अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसास्थळांची माहिती आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली वारसा फेरी नागरिकांना आता ऑनलाइन स्वरूपात अनुभवता येणार आहे.
शहरातील पर्यावरणविषयी काम करणाऱ्या आदिती देवधर यांनी वारसा स्थळांचा नकाशा विकसित केला आहे. “अजून सुरुवात आहे. आत्ता केवळ 19 वारसास्थळांची माहिती नकाशात आहे. हळूहळू पुणे शहरातील सर्व वारसास्थळे त्यात सामील केली जातील,’ असे आदिती देवधर यांनी सांगितले आहे.
अशी अनुभवा “व्हर्च्यूअल ट्रिप‘
वेबसाइट वर जाऊन, मेनूमध्ये “पुणे हेरिटेज प्लेस मॅप’वर क्लिक केल्यावर वारसा स्थळाची छोटीशी भटकंती तुम्हाला सहज अनुभवता येणार आहे. या लिंकवर पुण्याच्या नकाशा तुम्हाला दिसेल. तिथे तुमचा पत्ता (किंवा कुठलाही पत्ता) टाकून, भिंगाच्या चित्रावर क्लिक केले, की तुम्ही दिलेल्या पत्त्याच्या 10 कि. मी. त्रिज्येमध्ये असणारी वारस्थास्थळे दिसतील. तुम्ही दिलेल्या पत्त्याच्या सर्वात जवळचे स्थळ आधी, आणि सगळ्यात लांबचे शेवटी, अशा तऱ्हेने वारसास्थळे अनुक्रमे नकाशावर दिसतील. कडेला, त्यांचा पत्ता, आणि ज्या वारसास्थळांसाठी वारसा फेरी उपलब्ध आहे, तेथे तसे लिहिले असेल.