सातारा (प्रतिनिधी) – सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर एका व्यक्तीला पोलिसांकडून झालेल्या मारहाणप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. याबाबतच्या व्हिडिओची शहानिशा करुन घटनेमागची पार्श्वभूमी समजावून घेऊन चौकशी होईल, असे त्यांनी सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला आहे. राज्यातही तशी पावले उचलण्यात येत आहेत. त्याची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात देखील चाेखपणे करण्यात येत आहे. रस्त्यांवर आवश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकानदारांना देखील नियमावली करुन देण्यात आली आहे. मुख्य बाजारपेठेत कामाशिवाय आलेल्या युवकांना पाेलिस चांगलाच हिसका दाखवित आहेत.
दुसरीकडे मात्र गेल्या दाेन दिवसांत माेती चाैक , नगरपालिका परिसरात काही औषध विक्रेत्यांच्या कामगारांना काेणतीही विचारपूस न करता पाेलिसांना मारल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मारहाण केलेल्या कामगारांनी शहरातील औषध विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये माल पाेचविण्यासाठी आम्ही जाणार नसल्याचे त्यांच्या मालकांना सांगितले. त्यामुळे आजच्या घडीला औषध विक्रेत्यांना जागेवर माल मिळण्यास अडचण ठरत आहे.
तर दुसरीकडे बुधवारी सायंकाळच्या सुमारास तालुका पाेलिस स्टेशन समाेर एक व्यक्ती रस्त्यावर आल्याने पाेलिसाने त्याच्यावर बडगा उगारला. रस्त्यावर का आला असे विचारल्यावर त्याने व्यवस्थित उत्तर न दिल्यामुळे पोलिसाने त्याला फटकावले. एक दाेन काठ्या खाल्यानंतर त्या व्यक्तीने सरळ पाेलिसालाच धरले. त्याची मानगुट आवळून धरली. त्यानंतर तेथे काही अंतरावर असलेले काही पाेलिस तेथे आले. त्यांनी संबंधित व्यक्तीपासून पाेलिसाला बाजू केले. पाेलिसाच्या अन्य सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीस काठ्या मारल्या. चिडलेल्या व्यक्तीने पाेलिसांची काठी हिसकावून घेत त्यांच्यावर चाल केली. काही क्षणांत तेथे उपस्थित असलेल्या पाेलिसांनी त्याचा समाचार घेतला. दरम्यान, या सर्व गोंधळात केंद्र सरकारने लॉक डाऊन केले असून त्याचे तीन तेरा उडणार नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे