‘पीएमपी’ कर्मचाऱ्यांना मिळणार ‘लॉकडाऊन’ काळातील वेतन

नयना गुंडे यांची माहिती; “रोजंदारी’ संदर्भात निर्णय गुलदस्त्यात

पिंपरी -“पीएमपी’कडे कायमस्वरुपी कार्यरत असलेल्या कामगारांना बंद काळातील वेतन देण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. मात्र रोजंदारीवर कार्यरत असलेल्या चालक व वाहकांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन पीएमपी पाळणार की मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावणार हे पहावे लागणार आहे.

“करोना’च्या पार्श्‍वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्याने पीएमपीच्या सर्व बस डेपोमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवेसाठी दहा टक्‍के बस वापरल्या जात असल्याने रोज पीएमपीमध्ये कामावर असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले आहे. कायम असल्यानंतरही सुट्टी घेणाऱ्या पीएमपी कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात येते. सध्या चालक आणि वाहक घरीच असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पीएमपी प्रशासनाने याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माणुसकीच्या भावनेतून खासगी अस्थापना, कंपन्या तसेच इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, असे आवाहन केले आहे. या आवाहनानंतरही पीएमपी प्रशासनाने कोणताच खुलासा न केल्यामुळे पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता जे कर्मचारी कायम आहेत त्यांना वेतन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांबाबत कोणताच निर्णय घेण्यात न आल्याचे सांगून हा निर्णय त्यांनी गुलदस्त्यात ठेवला.

वेतन देणे गरजेचे
“पीएमपी’मध्ये कार्यरत असलेल्या व नुकतेच कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना अल्प वेतन आहे. रोजदांरीवरील कर्मचाऱ्यांची अवस्था तर त्याहून वाईट आहे. वेतनावरच घर चालत असल्यामुळे वेतन कपात करू नये, अशी मागणी कामगार संघटनांकडून होत आहे. पीएमपी प्रशासनाने याबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ठेकेदारी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट
“पीएमपी’ प्रशासनाने खासगी ठेकेदाराकडून खासगी ठेकेदाराकडून काही बस भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत. या बसवर खासगी ठेकेदाराने चालक कामावर ठेवलेले आहेत. या चालकांनाही अल्पवेतन आहे. एकाही ठेकेदाराने वेतन मिळणार की नाही याबाबत काहीच स्पष्टता नसल्यामुळे या चालकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.