नगर – शहराजवळील केडगाव बायपास चौकात अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या कारचा पुढील टायर फुटला. चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला घेत नियंत्रण मिळवल्याने ते थोडक्यात बचावले. कारमधील कुणालाही इजा झाली नसून ते लगेचच परभणीच्या दिशेने रवाना झाले.
अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे परभणीचे पालकमंत्री आहेत. आज सकाळी ते मुंबई येथून परभणीला आढावा बैठकीला जाण्यासाठी सरकारी वाहनातून नगरमार्गे जात होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास केडगाव बायपास रस्त्यावर त्यांची कार आली होती. नील हॉटेलसमोर लावलेल्या बॅरीकेटमधून एक कंटनेर जात होता.
कंटनेर व बॅरीकेटमधून कार जेमतेम जाऊ शकेल एव्हढाच रस्ता होता. ना. मलिक यांच्या कारचा वेग कमी करण्यासाठी या पॉईंटवर उभे असलेले शहर वाहतूक व कोतवालीचे पोलिसही सरसावले होते. ना. मलिक यांच्या चालकाने या जागेतून त्यांची कार पुढे नेली. त्याचवेळी चालकाच्या बाजूने टोकदार दगडाने त्यांच्या कारचे पुढील चाक फुटले. चाक फुटल्यानंतर ना. मलिक यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी डाव्या बाजूने घेत सुमारे तीनशे मीटर अंतरावर उभी केली.
याचवेळी चालकाने ब्रेक दाबले असते तर गाडी उलटण्याचा धोका होता. परंतु, चालकाने कार रस्त्याच्या कडेने उभी केल्याने संभाव्य धोका टळला. तोपर्यंत घटनास्थळी उभे असलेले पोलीस कर्मचारी सतिष खामकर, तानाजी पवार, ड्रायव्हर सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोरख कल्हापुरे यांनी मदत केली.