40 लाख पुणेकरांनी स्वत:ला केले “क्वॉरंटाइन’
381 चौरस किलोमीटरच्या पुणे शहरातील गल्लीबोळ
मुख्य रस्ते ओस
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 40 लाख पुणेकरांनी जनता कर्फ्युला अभूतपूर्व प्रतिसाद देत, करोनाला रोखण्यासाठी रविवारी स्वत:ला घरातच थांबवत जणू “क्वॉरंटाइन’चे केले.
शहरावर आलेल्या करोना या संकटावर मात करण्यासाठी सामाजिक भान आणि आपली जबाबदारी यशस्वीपणे पेलत पुणेकरांनी आणखी एक आदर्श घालून दिला आहे. पहाटेपासूनच पुणेकर स्वत: घरात बंद झाले. त्यामुळे तब्बल 381 चौरस किलोमीटरच्या पुणे शहरातील गल्लीबोळ, मुख्य रस्ते ओस पडले होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवांसाठी पीएमपी अंशत: सुरू होती. तसेच महापालिकेच्या घनकचरा, आरोग्य, पाणीपुरवठा विभागासह पोलिसांनीही या कर्फ्यूमध्ये आपली भूमिका चोख बजावल्याने शहरात निरव शांतता होती.
अकरा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे शहरात स्वाइन फ्लूची साथ पसरल्यानंतर अघोषित संचारबंदीचा अनुभव शहराने घेतला. दरम्यान, या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या त्यात शहर स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच इतर बाबींसाठी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी पीएमपी, रुग्णवाहीकाही सुरू होत्या. मात्र, याव्यतिरिक्त शहरात कोठेही नागरिक घराबाहेर नव्हते. त्यापेक्षाही चांगली बाब म्हणजे नागरीक सोसायटीच्या पार्किंगमध्येही आले नाहीत. त्यामुळे शहरात हा कर्फ्यू शतप्रतिशत यशस्वी झाला आहे.
अत्यावश्यक सेवा सुरूच
या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सुरूच होत्या. त्यात पीएमपी, दवाखाने, घनकचरा व्यवस्थापन महापालिकेचा पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाच्या कामाचा समावेश होता. पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देत या कर्फ्यूमध्ये आपली शहर स्वच्छतेची जबाबदारी पूर्ण करत यामध्ये आपला सहभाग नोंदवला.
उत्साहींना पोलिसांचा “प्रसाद’
शहरात काही उपनगरांमध्ये उत्साही नागरिक तसेच युवकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. मात्र, त्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लगेचच आळा घातला. काही ठिकाणी अशा उत्साही कार्यकर्त्यांना लाठ्यांचा “प्रसाद’ही देण्यात आला. तर काही ठिकाणी नागरिक घराबाहेर गप्पा मारत थांबले असताना, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी समज देत घरीच थांबण्याच्या सूचना केल्या.