विभागीय आयुक्तांचे सर्व डॉक्टरांना आवाहन
पुणे – सर्दी, ताप, खोकला, अशक्तपणा किंवा अन्य आजारांवर बहुतांश नागरिक फॅमिली डॉक्टरांकडे जातात. मात्र, करोना विषाणूमुळे नागरिकांसह खासगी डॉक्टरांनीही सतर्कता बाळगावी. त्यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप, घसा यासाठी खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची माहिती घ्यावी. ती व्यक्ती मागील 28 दिवसांत परदेशात जाऊन आली किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली आहे की नाही याची माहिती घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे.
“करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच हवामान बदल होत असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला अशी असे आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. मात्र, सध्या करोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला असून, सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. आतापर्यंत 15 रुग्ण करोनाबाधित आहे. दरम्यान, साथीच्या आजारासह अन्य आजार झाल्यावर बहुतांश नागरिक बड्या रुग्णालयांमध्ये न जाता घराच्या परिसरात असलेल्या ओळखीच्या डॉक्टरांकडेच उपचारासाठी जातात.
परंतू, सध्या परदेशातून आलेले व्यक्तीही फॅमिली डॉक्टरांकडेच उपचारासाठी जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी या खासगी दवाखान्यातील डॉक्टरांना आवाहन करत, “तुमच्या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती लिहून ठेवा.’ त्याला काय त्रास आहे, कधीपासून आहे, कुठे राहतो, तो बाधित देशातून किंवा अन्य देशातून आला आहे का? आला असेल तर कधी आणि किती दिवस परदेशात होता. त्याचबरोबर परदेशात गेलेला नाही, मात्र बाधित देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला, की नाही याची माहिती डॉक्टरांनी आवश्यक घ्यावी. जेणेकरून हा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.