डिकसळ – मटण व मासे बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली. धुळवडीनिमित्त भिगवण, डिकसळ परिसरातील मटण दुकानांवर मटण खरेदीसाठी पहाटेपासूनच झुंबड उडाली होती. दिवसभरात सुमारे शेकडो बोकडे व भिगवण मासे मार्केट मध्ये १ टन माशांचा मटन खवय्यांनी फडशा पाडला.
मटण दुकानासमोर नागरिकांनी पहाटेपासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. भिगवण मधील पुणे-सोलापूर महामार्गलगतच्या मटन दुकान मच्छी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी दिसत होती.
बोकडाच्या मटनाचा दर ५८० ते ६०० रुपये प्रति किलो असा होता. तर बॉयलर कोंबडीचे मटन प्रति किलो 60 ते १००रुपये, जिवंत देशी कोंबडा-कोंबडीचा प्रति किलो दर १०० ते १५० रुपये आहे. गतवर्षापेक्षा यंदा मटणाच्या दरात वाढ झाली असली तरीही मटण विक्री मात्र वाढ होत आहे. तसेच अनेकांनी चिकनला फाटा देत बोकडाच्या मटनाला अधिक पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
धुळवडीला मटणाची मागणी वाढल्याने मटण विक्रेत्यांनी धांदल उडत होती. अनेक विक्रेत्यांनी दुकानात वाढीव कर्मचारी नेमले होते. तरीही मटण विक्रेत्यांची ही धांदल दुपारनंतर शिगेला पोहोचली होती. सायंकाळी उशीरापर्यंत मटण-मासे विक्रेत्या दुकानासमोर गर्दी दिसत होती.
मासे मार्केट मध्ये कटला, पापलेट, सुरमई, बांगडा, कोळंबी, मरळ प्रकारचे मासे विक्रीसाठी मच्छी मार्केटमध्ये उपलब्ध होते. मासे खाणारे कटला जास्त पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मटण, चिकन मासे व मच्छी मार्केटमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली. धुळवड साजरी करण्यासाठी तळीरामांनी ढाबे, परमिट रुम बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी दुकानावर गर्दी केली होती. शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी घराबाहेर गर्द झाडीतही बेत करुन धुळवड साजरी केली.