शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांचा टोला
अयोध्या : भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपापासून वेगळे झालो आहोत. पण हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. त्यापासून आम्ही वेगळे होणार नाही, असे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
रामलल्लाच्या दर्शनासाठी श्री. ठाकरे शनिवारी आयोध्येत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी नोव्हेंबर 2018 मध्ये पहिल्यांदा येथे आलो होतो. त्यावेळी मी मागणी केली होती की विशेष कायदा करून राममंदिराची उभारणी करावी. तसा कायदा काही झाला नाही, अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता चिमटा काढला.
मात्र न्यायलयाने निर्णय देऊन राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले. त्यावेळी मी शिवाजी महाराच्या पदस्पर्शाने पुनित झालेली त्यांची जन्मभूमी शिवनेरीची माती आणली होती. त्यानंतर मी मुख्यमंत्री बनलो. हा रामलल्लाचा आशिर्वाद होता, असे मी मानतो. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी मी वारंवार येईन.
उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला थोडी जागा द्यावी. म्हणजे आम्ही महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र भवन उभारू, असेहीठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्याचवेळी राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना एक कोटी रुपये देईल, अशी त्यांनी घोषणा केली.
कोरोनाची साथ असल्याने मी आज शरयु नदीची आरती करणार नाही. मात्र शरयू नदीची आरती करण्यासाठी मी पुन्हा येईन. येथे आलो की माझे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मला आठवण येते. राममंदिराच्या उबारणीसाठी ते आग्रही होते, असेही ठाकरे म्हणाले.