‘करोना’च्या पार्श्वभूमीवर नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विशेष कक्ष
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
पुणे – नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. “करोना’चा एकही रूग्ण मागील दीड महिन्यांत पुण्यात दाखल झालेला नाही. रुग्णालयात तपासणी केलेल्या संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. नागरिकांनी घाबरू नये. “करोना’च्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेतली जात असून, महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असल्याची ग्वाही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौरांनी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागप्रमुख डॉ. राजेंद्र हंकारे, डॉ. संजीव वावरे आदी उपस्थित होते.
डॉक्टर्स, नर्सेस वॉर्डबॉय, आया आदींना प्रशिक्षण दिले आहे. तर, 11 खासगी रुग्णालयांसोबत बैठक घेतली असून, 30 विलगीकरण बेड आणि 11 आयसीयू बेड आरक्षित ठेवण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
पुणे मनपा रुग्णालय, खासगी रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावली आहेत. आरोग्य विभागामार्फत माहिती प्रसारित केली आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून, सार्वजनिक ठिकाणी वावरताना विशेष काळजी घ्यावी. शहरांत काही ठिकाणी मास्कची चढ्या भावाने विक्री होत असल्यास कारवाई करण्यात येईल, असे मोहोळ म्हणाले.
उपचारांसाठी बाहेर जाण्याची वेळ येणार नाही
येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत 10 बेडचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीच्या उपलब्धतेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. याबाबत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य प्रमुख आदींना सूचना दिल्या आहेत. आयसीयूच्या सुविधेसाठी इतर कोठेही जाण्याची वेळ येणार नाही. यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.