लोणंद – लोणंद कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची आवक 10,000 पिशवी झाली असून कांद्याचे दर 2150 रुपये प्रति क्विटंल पर्यत तेजीत निघाले आहेत. कांद्याच्या दरामध्ये चढउतार होत असल्याने कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्याने लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणताना दिसत आहे.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी विक्रीसाठी राज्यात प्रसिध्द असून लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खंडाळा, फलटण, माण, कोरेगाव, वाई, पुरदंर, बारामती आदी तालुक्यामधुन मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस येत असतो. हळवा कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना साठवून ठेवता येत नाही. गरवा कांदा अधिक काळ खराब होत नसल्याने काही काळापर्यत मार्केटला पुरतो, पण उन्हाळी गरवा कांदा फक्त महाराष्ट्रातच पिकतो, त्यामुळे नंतर नवीन हळवा कांदा बाजारात येईपर्यत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात. मात्र गेल्या काही आठवड्यात नवीन कांदा मार्केटला येऊ लागल्यानंतर बाजारात शंभरी पार गेलेला कांदा वीस पंचवीस रुपये किलोने ग्राहकांना मिळतोय.
गुरुवारी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 10,000 रुपये नव्या कांद्याची आवक झाल्याने नंबर 1 च्या कांद्याचे भाव 2150 ते 1400 रू. इतके राहिले. तर 2 नंबर कांदा 1400 ते 1000 तर गोल्टी कांदा 1000 ते 500 असे भाव निघाले असल्याची माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली. लोणंद बाजार समितीमध्ये शेतकऱ्यानी कांदा चांगला वाळवून, निवडून प्रतवारी करुन विक्रीस आणावा असे आवाहन सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.