दहा दिवसांच्या आत माफी मागा, अन्यथा गुन्हा दाखल करण्याचा इशारा
पुणे – कीर्तनकार, समाजप्रबोधनकार म्हणून लोकप्रिय असणाऱ्या निवृत्ती महाराज इंदुरीकर आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. इंदुरीकर महाराजांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्द्ल दहा दिवसांच्या आत माफी मागावी, अन्यथा न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देणारी कायदेशीर नोटीस महाराजांना पाठवण्यात आली आहे.
ऍड. मिलिंद पवार यांच्यामार्फत देसाई यांनी निवृत्ती महाराजांना नोटीस पाठवली आहे. त्यात “इंदुरीकर हे जाहीर कीर्तनांतून महिला, तरूण मुली यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्यं करतात. तसेच महिलांविषयी दर्जाहिन भाषा वापरुन जाहीर अपमान करतात. नुकतेच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
त्याबद्दल त्यांनी खुलासा करावा. तसेच भविष्यात पुन्हा महिलांना आपल्या कीर्तनातून अपमानास्पद जाहीरपणे बोलणार नसल्याचे सांगावे. आणि आपल्या हस्तकांच्या वतीने धमक्या देणे आणि चारित्र्याची बदनामी थांबवावी,’ अशी मागणी देसाई यांनी केली आहे.