डॉ. डी. जी. पवार; नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व रोगनिदान शिबिर
नागठाणे – सर्व रोगनिदान शिबिराचा लाभ समाजातील सर्व गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना होईल व ग्रामीण भागात आजाराबाबत जागरूकता निर्माण होईल.
या शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या अनेक गंभीर आजाराचे निदान होऊन त्यांना मोफत औषधोपचार मिळेल, असे मत सातारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. पवार यांनी व्यक्त केले. आरोग्य विभाग, नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व सातारा येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या सर्व रोगनिदान शिबिरात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर होत्या. या शिबिरात अस्थिरोग, मधुमेह, कर्करोग, किडनीचे आजार, त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू इत्यादी आजारांच्या मोफत तपासण्या तज्ज्ञांच्या साह्याने करण्यात आल्या.
या शिबिराचा लाभ नागठाणेसह, कुमठे प्राथमिक आरोग्य केंद्र व नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील 50 ते 60 गावांतील गरजू, गरीब लोकांनी घेतला. कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव, नागठाणेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोहिते, शेंद्रे गट जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजीराव चव्हाण, पंचायत समिती सदस्या विजया गुरव, बेबीताई जाधव, सरपंच विष्णू साळुंखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी होण्यासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. कांबळे, डॉ. पराग जोशी, डॉ. रविराज निकम, नागठाणे, कुमठे व नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील धर्माधिकारी यांनी तर आभार डॉ. रविराज निकम यांनी मानले. शिबिरामध्ये परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला.