डच गुलाबाच्या गड्डीचे भाव तेजीत : आवक वाढणार
पुणे – प्रेमी युगलांचा सण असलेल्या व्हेलेंटाइन डे येत्या शुक्रवारी (दि.14) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डातील फूल बाजारात गुलाबांची आवक वाढली असून विविधरंगी गुलाबांमुळे फूल बाजार बहरला आहे. बुधवारी बाजारात मावळ तसेच जिल्ह्याच्या अन्य भागातून 7 हजार 293 गुलाब गड्डींची आवक झाली. घाऊक बाजारात डच गुलाबाच्या गड्डीचे भाव तेजीत असून गुलाबाच्या 20 काड्यांच्या गड्डीला 150 ते 220 रुपये असा भाव मिळाला आहे.
व्हेलेंटाइन डे म्हणजेच प्रेमदिनासाठी युवक-युवतींकडून गुलाबांना मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांत व्हेलेंटाइन डेसाठी गुलाबाला मागणी वाढली असून, मावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर गुलाबाची लागवड करतात. विविध रंगी डच गुलाबांना मोठी मागणी असते. बुधवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फूल बाजारात मावळ तालुका तसेच परिसरातून 7 हजार 293 डच गुलाबांच्या गड्डींची आवक झाली. गुरुवारी गुलाबाची आवक वाढेल, अशी माहिती फूलबाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.
यंदा अवेळी पाऊस तसेच हवामानातील बदलांचा परिणाम गुलाब लागवडीवर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाब गड्डींची आवक कमी झाली आहे. घाऊक फूल बाजारात वीस काड्यांच्या डच गुलाबाच्या गड्डीला 150 ते 220 रुपये असे भाव मिळाले आहेत. गुरुवारपर्यंत गुलाबगड्डीचे भाव तेजीत राहतील. त्यानंतर पुन्हा भाव कमी होतील.
– सागर भोसले, फुलांचे व्यापारी