सरकार सकारात्मक : मंत्रालयात नुकतीच पार पडली बैठक
पुणे – सर्वसामान्य नागरिकांकडे गॅस कनेक्शन असते, मात्र गॅस सिलिंडर विकत घेण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे त्यांना केरोसिन आवश्यक असते. या जनतेसाठी केरोसिन वाटपाचे नियम व अटी शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसिन तेलाचा पुरवठा गरजूंना करण्याबाबतची बैठक नुकतीच मंत्रालयात झाली.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राप्त होणारे अनुदानित दराचे केरोसिन केवळ बिगर गॅसजोडणी शिधा पत्रिकाधारकांकरिता प्राप्त होते. राज्याला उपलब्ध होणाऱ्या केरोसिन कोट्याच्या प्रमाणानुसार शिधा पत्रिकाधारकांना केरोसिन वितरण परिमाण किमान दोन लिटर ते कमाल चार लिटर असे निश्चित आहे. त्यात वाढ करण्याबाबत तपासणी केली जाईल.
अनुदानित दराचे केरोसिन केवळ बिगर गॅसजोडणी शिधा पत्रिकाधारकांनाच प्राप्त व्हावे, यासाठी गॅसजोडणी नसल्याबाबतचे हमीपत्र घेऊनच केरोसिन वितरित करण्याच्या सूचना शासन परिपत्रक दि. 1 ऑगस्ट 2018 अन्वये दिल्या आहेत. हे हमीपत्र सोपे व सुटसुटीत करण्याचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत क्षेत्रिय कार्यालयांकडून प्राप्त होणाऱ्या मागणीनुसार हमीपत्र सादर करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांकरिता 100 टक्के केरोसिन नियतन शासनाकडून जिल्ह्यांना मंजूर करण्यात येत असल्याने विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील कोणीही पात्र लाभार्थी केरोसिनपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने नव्याने माहिती मागविण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शहरी भाग केरोसिनमुक्त केल्याने, सर्वसामान्यांना 90 ते 95 रुपये प्रतिलिटर दराने खुल्या बाजारातून केरोसिन विकत घ्यावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे एका सिलिंडरधारकाला दोन लिटर तर दोन सिलिंडरधारकाला एक लिटर केरोसिन उपलब्ध करुन दिल्यास, रेशनिंग दुकानांमधील अन्य माल खपण्यासदेखील हातभार लागू शकेल. यावर मंत्रालयातील बैठकीत चर्चा झाली आहे.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशन