बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान या माध्यमांमधून नेहमीच चर्चेत असतात. जितक्या बोल्डपणे झिनत पडद्यावर वावरली तितक्याच स्पष्टपणाने ती आपली मते मांडताना दिसते. अलीकडेच तिने असे म्हटले आहे की, बॉलीवूडमध्ये सध्या महिलांच्या वयोमानानुसार सुयोग्य व्यक्तिरेखा कमी होत चालल्या आहेत. कथानकांमध्ये अशा व्यक्तिरेखांसाठी जागाच दिसत नाहीये. त्यामुळेच मी सध्या फारशी कुठे झळकताना दिसत नाहीये.
जवळपास 15 वर्षांनंतर झिनत पुन्हा एकदा थिएटरकडे वळली आहे. “डियरेस्ट बापू, लव कस्तुरबा’ नामक एका नाटकामध्ये कस्तुरबांची भूमिका करताना झीनत स्टेजवर दिसणार आहे. “द ग्रेट इंडियन थिएयटर फेस्टिवल’मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर पार पडणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सैफ हैदर हसन यांनी केले असून नाटकात आरिफ जकारिया यांची भूमिकाही असणार आहे.
यानिमित्ताने बोलताना झिनत सांगते की, मला एखाद्या व्यक्तिरेखेसाठी प्रस्ताव आला की मी कथानक वाचून पाहते. कथानक आणि व्यक्तिरेखा आवडली की मी लागलीच स्वीकारुन मोकळी होते. “हरे राम हरे कृष्णा’मध्येही जेनिसची व्यक्तिरेखा मी अशीच निवडली होती. प्रेक्षकांनाही ती वास्तवाच्या जवळ जाणारी वाटली आणि त्यामुळेच आवडली. सध्या मी या नाटकात काम करत असून भविष्याबाबत मी फारसा विचार करत नाही. मी वर्तमानात जगणारी आहे.