कराड – साखर कारखाने सुरु होऊन दोन महिन्याचा अवधी लोटला. ऊसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. मात्र ऊस वाहतूकदारांना घालून दिलेल्या नियमांना केराची टोपली दाखवल्याने छोट्या-मोठ्या अपघातात वाढ होऊ लागली आहे. याकडे हायवे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर जशी कारवाई होते, तशी या ऊस वाहतुकीवर होणार का? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
महामार्ग म्हंटले की, समस्याचा बाजार अन् अपघाताची मालिका अशी स्थिती जिल्ह्यातील आहे.आतातर साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे यामध्ये आणखीनच वाढ होत आहे. यंदा अधिक पाऊसकाळ झाल्याने ऊस गाळप करणारे साखर कारखाने महिनाभर उशिरा सुरू झाले. त्यानंतर आत्ता ऊसतोडीच्या हंगामाने ग्रीप घेतली आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी योग्य ऊसतोडी सुरू आहेत.
मात्र या ऊसाची वाहतूकही धोकादायक सुरू असल्याचे समोर येत आहे. महामार्ग पोलीस व कारखान्यांकडून ऊस वाहतूकदारांना सूचना करूनही रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक ट्रॉलीवर काहीजण रिफ्लेक्टर न लावता वाहतूक सुरू ठेवत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वेगणे वाहतूक सुरू ठेवणे, जास्त ऊस भरून वाहतूक करणे, कमकुवत वाहनांमधून मोठ्या प्रमाणात ऊस नेणे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मागील आठवड्यातच कोल्हापूर नाक्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या पलटी होऊन अपघात झाला होता. सुदैवाने आजूबाजूला वाहने नसल्याने जीवितहानी टळली होती.
मात्र, या व अशा अपघातात दिवसेंदिवस होत आहे. रात्रीच्या वेळी ऊसाच्या मागील ट्रॉलीवर काही वाहनधारक रिफ्लेक्ट लावत नसल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांनाही ऊस वाहतूक करणारी वाहने दिसत नाहीत. अचानक जेव्हा ही वाहने दिसतात, तेव्हा मात्र वेळ गेलेली असते. परिणामी अपघात होतात असे असतानाही महामार्ग पोलीस मात्र तिकडे आवश्यक असे लक्ष देताना दिसत नाहीत. टोल नाक्यावर थांबणे आणि पावत्या फाडून वाहनधारकांना त्रास देणे, यातच ते धन्यता मानत आहेत. यामुळे आपल्याला हटकणारे कोण नाही? हा समज काही ऊस वाहतूकदारांचा झाल्याने ते बिनधास्तपणे हायवेवर कसेही वावरत आहेत.
कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, मोठमोठ्याने साउंड सिस्टिम लावणे, आवश्यक अशी वेगमर्यादा न पाळणे हे नित्याचेच बनलेले आहे. यामुळे महामार्गावरील अन्य प्रवासी मात्र वेठीस धरले जाते आहेत. याकडे महामार्ग पोलिसांनी लक्ष देऊन अशा ऊस वाहतूकदारांवर कारवाई सुरू ठेवावी, अशी अपेक्षा वाहन धारकांकडून व्यक्ती केली जात आहे.