जुन्नर – संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे 10 ते 12 हजार भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, प्रभाकर गडदे, मच्छिंद्रशेठ शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविकभक्त उपस्थित होते.
श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 वाजता व दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने केले होते.
रात्री 9:53 वाजता चंद्रोदयावेळी श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.