दिग्गज वकील उज्ज्वल निकम लढणार खटला
नागपूर – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. हा खटला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लढतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
गृहमंत्री देशमुख यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची भेट घेतली. यावेळी नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील केसवानी उपस्थित होते. यावेळी सुमारे पाऊण तास गृहमंत्री देशमुख आणि डॉक्टर केसवानी यांनी रुग्णाचे कुटुंबीय आणि डॉक्टरांशी चर्चा केली.
पीडित तरुणीवर योग्य उपचार होत असून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची गरज नसल्याचे डॉक्टर केसवानी यांनी सांगितले. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. तर झालेला प्रकार हा निंदनीय आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवू. तसेच हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे उज्वल निकम यांची नियुक्ती करू, असेही देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, हिंगणघाटमध्ये सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या प्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.