पालिकेचे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचे लेखी आदेश
पुणे – शिवभोजन केंद्रात व ज्या शासकीय इमारतीमध्ये ही थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या अस्थापनेमधील कर्मचाऱ्यांना ही थाळी सवलतीच्या दरात घेण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने या थाळीचे जेवण घेऊ नये, असे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत. महापालिकेच्या इमारतीमधील निशीगंधा या कॅन्टीनमध्ये 26 जानेवारी पासून ही थाळी सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये पालिकेचे सुमारे साडेचार ते पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर कामानिमित्ताने दररोज सुमारे तेवढेच कर्मचारी पालिकेत येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून या थाळीचा लाभ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन राज्यशासनाच्या धोरणानुसार व शिवभोजन थाळीसाठीच्या नियमानुसार, हे आदेश काढण्यात आले असून सर्व विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही या आदेशात करण्यात आल्या आहेत.