चोरट्यांचा गॅस कटरने मशीन कापण्याचा प्रयत्न
पिंपरी – चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात लागलेल्या आगीत मशीनमध्ये असलेल्या सात लाख 99 हजार 800 रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी (दि. 27) पहाटे दोन वाजताच्या सुमारास थेरगाव येथील ऍक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये घडली.
दिनेश धोंडीराव शिर्के (वय 27, रा. ममता स्विटजवळ, दिघी) यांनी सोमवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेशनगर, थेरगाव येथील उज्जवला कॉम्प्लेक्समध्ये ऍक्सिस बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. रविवारी रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास चोरटे एटीएम सेंटरमध्ये आले. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा मुख्य दरवाजा कापत असताना अचानक आग लागली. या आगीत सात लाख 99 हजार 800 रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मागच्याच आठवड्यात सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांची बैठक घेतली. एटीएम व सराफाच्या दुकानातील चोऱ्या थांबविण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्याचे आदेश देत पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच चोऱ्या टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र चोरट्यांचे उद्योग सुरूच आहेत.