पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबतचे आदेश सोमवारी (दि. 27) दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस खात्यात फेरबदल होणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती. मात्र बालेवाडी येथे होणाऱ्या शूटींग स्पर्धेमुळे अपेक्षित बदल्या स्पर्धेनंतर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. मात्र स्पर्धेनंतर पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई हे रजेवर गेले होते. रविवारी प्रजासत्ताक दिन झाल्यावर सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी आयुक्तांनी बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. तर दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या त्यांच्या विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. तर देवराम चव्हाण यांची वैद्यकीय कारणास्तव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांची निगडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदावर बदली करण्यात आली आहे.
बदली झालेले पोलीस निरीक्षक (कुठून कुठे)
शंकर बाबर (पिंपरी ते गुन्हे शाखा युनिट तीन, अतिरिक्त कार्यभार एमओबी), राजकुमार शिंदे (चिखली ते वाहतूक शाखा), मिलिंद वाघमारे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी), सतीश माने (वाकड ते चिखली), डॉ. विवेक मुगळीकर (गुन्हे शाखा युनिट तीन ते वाकड), राजेंद्र राजमाने (वाकड गुन्हे ते रावेत चौकी), गणेश जवादवाड (चिखली गुन्हे ते निगडी), राजेंद्र निकाळजे (निगडी गुन्हे ते पिंपरी गुन्हे), शहाजी पवार (संगणक विभाग ते तळेगाव दाभाडे गुन्हे), अरुण ओंबासे (भोसरी वाहतूक ते निगडी वाहतूक), शिवाजी गवारे (आळंदी वाहतूक ते भोसरी वाहतूक), देवेंद्र चव्हाण (भोसरी गुन्हे ते नियंत्रण कक्ष), सुनील टोणपे (निगडी ते निगडी गुन्हे).