बिजिंग : प्रलंयकारी कोरोना विषाणूच्या साथीतील चीनमधील मृतांची संख्या 106वर पोहोचली. चीनच्या मध्यवर्ती हुबेई प्रांतात रात्रीत 24 जणांना प्राणाला मुकावे लागले. तर राजधानी बिजिंगमधील पहिला मृत्यू सोमवारी रात्री उशीराने झाला. या विषाणूने बाधीतांची संख्या चार हजार 500 वर पोहोचली आहे.
कोरोना विषाणूंमुळे न्यमोनिया झाल्याचे सोमवार अखेर चार हजार 515 रुग्ण असल्याचे चिनी आरोग्य प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यात एकून 106 जणांचे बळी गेले, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. अद्याप 976 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आणि अन्य सहा हजार 973 जणांना बाधा झाल्याचा संशय आहे.
केवळ सोमवारीच एक हजार 771 नवे बाधीत आढळले. तर संशयितांची संख्या दोन हजार 077 होती. तर मरण पावलेल्यांची संख्या 26 होती. त्यात हुबेई प्रांतातील 24 जणांचा समावेश होता. 515 जणांची प्रकृती चिंताजनक बनली. तर उपचार करून बऱ्या झालेल्या नऊ जणांना हॉस्पिटलमधून सोडले.
संपूर्ण चीनमध्ये 44 हजार 132 संशयितांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. जर्मनीत एक रूग्ण सापडला. चीन व्यतीरिक्त 13 देशांत 50 जणांना बाधा झाल्याचे निश्चित झाले आहे. चीनला जाणे रद्द करण्यासाठी धोक्याचा थ्री स्टार इशारा देण्यात आला आहे. प्रवासावर बंधने घालून चीन स्वत:च विषाणूंचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न करत आहे. जेथे या विषाणूंची साथ पसरली आहे तेथे प्रवासास बंदी घालण्यात आल्याचे सरकारी वृत्तसंस्था झिन्हूआने म्हटले आहे.