पुणे : विविधतेत एकतेने नटलेला देश अशी आपल्या भारत देशाची जगभरात ओळख आहे. विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे नागरिक भारतात गुण्यागोविंदाने राहतात, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यात पहायला मिळाले. लष्कर भागात आयोजित आनंदयात्रेत हिंदू समाजासह मुस्लिम, बोहरी, यादव गोल्ला, आहीर गवळी, बौद्ध असे विविध जाती-धर्म- समाजाचे लोक एकत्रितपणे रस्त्यावर आले आणि हातात तिरंगी ध्वज घेऊन त्यांनी हम सब एक है चा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्रित संविधान वाचन केले.
केअर टेकर्स सोसायटीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्कर परिसरात आनंदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंदयात्रेस सुरूवात झाली. यावेळी लष्कर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, केअर टेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, पवन देडगावकर, विष्णू दोशी, संजय असरकर, अॅड प्रशांत यादव, शशिधर पुरम, स्मिता अंजुठे, सुवर्णा शिराळ, तृप्ती खेमकर, इरफान मुल्ला, हर्षराज बनसोडे, बालसुंदर ठूबे आदी उपस्थित होते.
आनंद यात्रेचे स्वागत मिलिंद सामाजिक मित्र मंडळ, सिध्दार्थ मित्र मंडळ, आर.पी.आय पुणे कॅन्टोन्मेंट शाखा, कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, किशोर सिंघवी मित्र मंडळ यांनी केले. यावेळी कॅम्प एज्युकेशन स्कूल मधील विद्यार्थींबरोबर परिसरातील नागरिक देखील यात्रेत सहभागी झाले होते.
राष्ट्रपुरूषांचे बलिदान व त्यांची आठवण करू देण्यासाठी राष्ट्रपुरूषांच्या वेशात बालचमू यात्रेत सहभागी झाले होते. बेटी बचाव, देश पढाव, गोमांस हत्या बंदी, पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला. गोळीबार मैदान- मोदीखाना- कुरेशी मस्जिद- भोपळे चौक- सेन्टर स्ट्रीट- बाटा चौक- अरोरा हॉटेल समोरील आंबडेकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यात्रेचा समारोप झाला.