सलग दुसऱ्या बैठकीत शंभर कोटींहून अधिकच्या विकासकामांना मंजुरी
शेवटच्या टप्प्यात विकासकामांना मंजुरी देण्यावर “स्थायी’चा भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने कोट्यवधींची उड्डाणे सुरूच ठेवली आहेत. सभापतींचा कार्यकाळ संपत आला असल्याने विकासकामांना मंजुरी देण्याचा धडाका सुरू आहे. बुधवारी (दि. 22) सभापती विलास मडेगिरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 109 कोटी 58 लाख 77 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
मागील आठवड्यातील बैठकीमध्येही शंभर कोटीचा आकडा पार केला होता. त्यामुळे सलग दोन बैठकांमध्ये स्थायी समितीने एक अब्जहून अधिकच्या विकासकामांना मंजुरी देण्याचा धडाका लावला आहे. यामध्ये रस्ते, ड्रेनेज, विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत.
शहरातील आकुर्डी येथील मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरातील जलनिस्सारणची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी 32 लाख 10 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील पुणे नाशिक महामार्गालगतच्या जलनिस्सारण नलिकांची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी 36 लाख 52 हजार रुपये खर्च केला जाणार आहे.
रहाटणी येथील नदीच्या कडेला असलेल्या जलवाहिनीचे काम करण्यासाठी 38 लाख 52 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 31 मधील किर्तीनगर, विनायकनगर, समर्थनगर येथे ड्रेनेज लाईन व चेंबरची देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी 59 लाख 63 हजार रुपये खर्च येणार आहे. थेरगाव येथील प्रभाग क्रमांक 23 व 24 मधील नाल्यातील अस्तित्वात असलेली ड्रेनेजलाईन रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी 67 लाख 27 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
याव्यतिरिक्त स्थापत्य विभागाच्या कामांनाही या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. दिघी येथे शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 79 लाख 95 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये माध्यमिक शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटचा विषय तहकूब
पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था झाली आहे. हा उड्डाणपूल धोकादायक असून त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या पूलाच्या दुरुस्तीसाठी निविदा राबविण्यात आली. प्राप्त निविदेच्या कमी दराने मेसर्स हरक्युलेस स्ट्रक्चरल सिस्टीम प्रायव्हेट या कंपनीने 8 कोटी 11 लाख 45 हजार रुपयांची निविदा सादर केली. मात्र स्थायी समितीच्या बैठकीत हे काम रेल्वे प्रशासनाने केले होते व पैसे महापालिकेने दिले असल्याचा निर्वाळा झाला. यावरून मतभेद झाल्याने हा विषय तहकूब करण्यात आला आहे. तसेच त्रैलोक्य स्माशानभूमीच्या नूतनीकरणाचाही विषय तहकूब करण्यात आला आहे. या निविदेमध्ये स्मशानभूमिमध्ये मृतदेहांसाठी शीतगृह उभारण्याचा उल्लेख होता. मात्र स्मशानभूमिमध्ये शीतगृह उभारणे शक्य नसल्याने विषय तहकूब केला असल्याचे सभापती विलास मडेगिरी यांनी सांगितले.