पुणे – महापालिकेकडून शहरातील 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या सर्व उड्डाणपूल आणि नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. महापालिकेने यापूर्वी 2017 मध्ये काही पुलांचे आणि त्यानंतर 2019 मध्ये काही पुलांचे ऑडिट केले होते. ऑडिटच्या कामासाठी महापालिका आयुक्तांनी 1 कोटी 30 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यानुसार तातडीने हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाकडून देण्यात आली.
शहरात नदीवरील 17, उड्डाणपूल 18 आणि रेल्वे लाईनवरील सुमारे 9 पूल आहेत. यातील काही पूल ब्रिटिशकालीन असून काही महापालिकेने बांधलेले आहे. या पुलांचे महापालिकेकडून दर पाच वर्षांची स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलास असलेला धोका, पुलासाठी तातडीने करायची दुरुस्ती याचे ऑडिट केले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार, पूल धोकादायक असल्यास ते बंद केले जातात. त्यामुळे महापालिकेकडून या वर्षी पुन्हा पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच हडपसर येथील उड्डाणपुलाच्या बेअरिंग तुटल्या होत्या. त्यामुळे जवळपास महिनाभर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे, या निमित्ताने तसेच पावसाळ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वित्तीय समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या पुलांचे ऑडिट
या ऑडिटमध्ये प्रामुख्याने दहा वर्षांपेक्षा जुन्या तसेच जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा समावेश असल्याची माहिती वाहतूक नियोजन विभागाकडून देण्यात आली. हे पूल जुने असल्याने त्यावर वाढलेल्या वाहतुकीमुळे अनेकदा जॉईंटला तडे जाणे, बेअरिंग खराब होणे, पुलाचा काही भाग कमकुवत होणे, पुलावर डांबराचे वजन वाढल्याने तडे जाणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास संभाव्य धोके टाळता येणार आहेत. याशिवाय, पुलांची तातडीची दुरुस्तीही करता येणार आहे. यापूर्वी केलेल्या ऑडिटमध्ये महापालिकेने शेजारील छत्रपती शिवाजी महाराज पूल आणि डेंगळे पुलाची अशाच प्रकार ऑडिटनंतर दुरुस्ती करण्यात आली आहे.