पुणे – देखभाल दुरुस्तीअभावी शहरातील काही क्रीडा संकुलांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे यापैकी काही क्रिडा संकुल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महापालिकेने साडेपाच कोटी खर्चून शहरातील १९ क्रीडा संकुलांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
पहिल्या टप्प्यात दहा क्रीडा संकुलांची दुरूस्ती निधी वर्ग करण्याबाबत स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यासाठी १ कोटी ९४ लाख रूपयांची आवश्यकता होती. हा निधी वैद्यकीय महाविद्यालय च्या निधीतून घेण्यात आला. त्यानंतर आता साडेतीन कोटी रूपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये ९ क्रीडा संकुलांचा समावेश आहे.
विविध कामांसाठीच्या निधीतून हा निधी वर्ग केला जाणार आहे. घोरपडी येथील राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल, शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ जलतरण तलाव, कर्वेनगर येथील बॅडमिंटन हॉल, शिवाजीनगर येथील जलतरण तलाव व व्यायामशाळा आणि नांदे जलतरण तलाव, विठ्ठलराव क्रीडा संकुल, रामचंद्र (आप्पा) बनकर क्रीडा संकुल, पद्मावती येथील शारदाबाई पवार क्रीडा संकुल, तळजाई येथील योगगुरू रामदेवबाबा क्रीडा संकुलांचा यामध्ये समावेश आहे.