उपअभियंत्याची चौकशी : आयुक्तांकडून कारवाई
पिंपरी – पुनावळे येथील आरक्षणाखाली विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानाच्या सीमाभिंतीच्या कामात दिरंगाई करणे महापालिका उपअभियंत्याला चांगलेच भोवले आहे. इतर विभागाशी समन्वय न ठेवता कामात दिरंगाई करणाऱ्या उपअभियंत्याची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. काम वेळेत पूर्ण न केल्याने चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
महापालिका उपअभियंता सुनीलदत्त नरोटे असे खातेनिहाय चौकशी सुरु केलेल्या उप अभियंत्याचे नाव आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवर गट “ब’ च्या महत्त्वाच्या उप अभियंता पदावर स्थापत्य विभागात नरोटे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पुनावळे येथील आरक्षणाखालील उद्यान विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. हे काम देव कंस्ट्रक्शन या ठेकेदाराला एक वर्षाच्या मुदतीकरता दिले होते.
या कामामध्ये उद्यान विकसित करण्यासाठी उद्यानात सीमाभिंत बांधण्याच्या कामाचा समावेश होता. विकसित करण्यात येत असलेल्या उद्यानात आरक्षणाच्या दोन्ही बाजूस स्थापत्य विभागामार्फत 18 मीटर विकास आराखड्यातील रस्ता, पदपथ, ड्रेनेज आणि रस्त्याचे डांबरीकरण आदी स्वरुपाचे कामकाज करण्यात येत आहे. उद्यानाच्या सीमाभिंतीच्या कामामध्ये इतर विभागाशी समन्वय न ठेवता दिरंगाई झाल्याची बाब समोर आली आहे. हे काम मुदतीत पूर्ण करून संबंधित विभागाशी समन्वय राखणे ही जबाबदारी नरोटे यांची होती. मात्र त्यांनी या कामामध्ये हलगर्जीपणा करत काम मुदतीत पूर्ण केले नाही. परिणामी ठेकेदारास भाववाढ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर हा अतिरिक्त ताण येणार आहे.
महापलिका उपअभियंता नरोटे यांनी अन्य विभागांशी समन्वय राखला नाही. तसेच कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे. कामात हलगर्जीपणा करून कामामध्ये दिरंगाई केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नरोटे यांच्यावर 15 दिवसांत दोषारोपपत्र ठेवावे, यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त हर्डीकर यांनी दिला आहे.