पुणे – जिल्ह्यातील धरणांच्या गळतीबाबत पावसाळयापूर्वी कार्यवाही करावी. सर्व धरणांचे स्ट्रक्चर ऑडिट पावसाळयापूर्वी करुन घेण्यात यावे. पुरामुळे संभाव्य बाधीत गावांची यादी तयार करुन जिल्हा नियंत्रण कक्षात देण्यात यावी. त्यासाठी सर्वेक्षण करावे. तसेच कालवा फुटून कोणती दुर्घटना घडू नये, यासाठी पाटबंधारे विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेणे. पूररेषा मार्क करणे, नदीपात्रातील गाळ तसेच जलपर्णी काढण्याबाबत कार्यवाही करणे, आदी सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
यासह पाटबंधारे विभागाने नदीपात्रालगत झोपडपट्ट्या व इतर धोक्यांच्या ठिकाणांचा अभ्यास करुन त्याची माहिती घेणे व नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी शोध आणि बचाव करण्यासाठी पाणी उपसण्याकरिता पंप, जनरेटर्स, बुलडोझर्स, बोट, इत्यादीची सोय करावी. तसेच पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांच्याशी समन्वय ठेवावा.