पुणे -महापालिकेकडून पावसाळ्यातील खबरदारी म्हणून शहरातील धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत सुमारे 1 हजार वाड्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यातील, तब्बल 34 वाडे अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. हे वाडे उतरविण्यास प्रशासनाने सुरुवात केली असून आतापर्यंत 6 वाडे पाडण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांनी दिली.
तर डागडुजी आवश्यक असलेल्या वाड्यांनाही नोटीसा बजाविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. महापालिकेने जवळपास दहा वर्षांपूर्वी धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर, दरवर्षी या वाड्यांना नोटीस देऊन पालिकेकडून कारवाई सुरू होती. या वर्षी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून टेक ब्युरो इंजि. प्रा. लि. या कंपनीकडून वाड्यांचे सर्व्हेक्षण करून घेतले.त्यात प्रामुख्याने बांधकामाशी संबधित आवश्यक असलेले स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे.
आतापर्यत सुमारे 1 हजार ते 1200 वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून उर्वरित 31 मे अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. मात्र, या सर्वेक्षण अहवालाची वाट न पाहता महापालिकेकडून अतिधोकादायक श्रेणीत येत असलेल्या 34 वाड्यांना उतरविण्याची नोटीस दिली आहे.
असे केले जाते धोकादायक वाड्यांचे वर्गीकरण
सी-1 : इमारत राहण्यास योग्य नाही, तत्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत.
सी-2ए : इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे.
सी-2बी : इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे.
सी-3 : म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे