पुणे – थंडी पडू लागताच शहरातील हवेतील प्रदूषके वाढून हवा प्रदूषित होऊ लागते. मात्र, यंदा हिवाळ्यातही पुण्यातील हवा स्वच्छ असून, हवेतील प्रदूषकांचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे देशातील इतर तीन शहरांच्या तुलनेत पुण्याची हवा “शुद्ध’ असल्याची नोंद अभ्यासकांकडून घेण्यात आली आहे.
थंडीमुळे शहरातील हवा जड होऊन हवेचे अभिसरण होण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळेच हिवाळ्यात हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे शहरातील हवा सर्वाधिक प्रदूषित होत असल्याचे चित्र दरवर्षी पहायला मिळते. मात्र, यंदा जानेवारीत शहाराचे तापमान घसरूनही हवेच्या प्रदूषणाची स्थिती उत्तम असल्याची नोंद “सफर’ या हवेच्या गुणवत्ताविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेतर्फे नोंदविण्यात आली आहे.
संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या नोंदीनुसार शहराच्या हवेतील पीएम 10 या प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण 86 क्युबिक घनमीटर इतके असून, पीएम 2.5 या घटकाचे प्रमाण 55 क्युबिक घनमीटर इतके आहे. हे प्रमाण मर्यादेपेक्षा कमी असल्यानेच शहराच्या हवेची स्थिती उत्तम असल्याची नोंद संस्थेतर्फे घेण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचीदेखील नोंद संस्थेकडून घेण्यात येते. या नोंदीनुसार दिल्लीतील हवेची गुणवत्ता “सर्वात वाईट’ असून, त्यापाठोपाठ मुंबईतील हवेची गुणवत्ता “वाईट’ या स्तरापर्यंत खालावली आहे. अहमदाबाद येथील हवेची गुणवत्तादेखील समाधानकारक आहे.