पेठ -सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात ज्वारी पिक जोमात आले आहे.अनुकूल वातावरण, पडणारी थंडी व पोषक हवामान यामुळे ज्वारी पीक दाणेदार कणसावर आले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरणात निर्माण झाले आहे.
चालू वर्षात पाऊस चांगला झाल्याने व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. या भागात पाच ते सहा फूट उंच ज्वारीच्या ताटांची वाढ झाली आहे. मोठ्या आकाराची टपोरी कणसे आली आहेत. आता पिकांचे रक्षण करण्यासाठी व पक्ष्यांनी दाणे खाऊ नये म्हणून भल्या पहाटे शेतात जाऊन राखण करावी लागते.
चालू वर्षी पाळीव जनावरांसाठी कडबा उत्पादन चांगले होणार असल्याने वर्षभर पुरेल इतके ज्वारी धान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. जनावरांसाठी चारा प्रश्न मिटणार असल्याचे शेतकरी दिलीप पवळे, दत्तात्रय पवळे, बंटी पवळे यांनी सांगितले.
पुढील महिन्यात ज्वारी पिकाची काढणी चालू होणार आहे. सध्या थंडी पडत असल्याने ज्वारी पिकाची टपोरी कणसे सर्वत्र दिसत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.
या भागात मोठ्याप्रमाणात ज्वारी पीक असल्याने राखण करण्यासाठी फारसा त्रास जाणवत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. या भागात ज्वारी जोमात आल्याने हुरडा पार्ट्या जोरात रंगू लागल्या आहेत. कडबा उत्पादन चांगले होणार असल्याने जनावरांनाही मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे. या परिसरातील शेतकरी ज्वारी राखण करण्यात गुंतला असल्याचे दिसत आहे.